Header Ads

पंढरीची वारी , Asadhivari , Pandharichiwari

।।  भेटी लागे जीवा! माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥

 पंढरीची वारी ही महाराष्ट्राची, देशाची धार्मिक आणि सामाजिक संस्कृती आहे. या वारीत भेदभाव विसरून मिळून मिसळून, फुगडी खेळत अनेकजण सहभागी होतात. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. पंढरपूरला येणारा बहुतांश वर्ग हा शेतकरी, सर्व सामान्य कुटुंबातील आहे. यंदाही लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. 


                                                            पंढरीची वारी

पंढरीची वारी हेच मुख्य व्रत आणि विठ्ठल हाच कुळीचे दैवत समजून शेकडो वर्षापासून वारीची परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे. लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने सावळ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतात आणि ऊन-वारा, पाऊस-गारा याची कोणतीही फिकीर न करता पंढरपूरला पोहचतात.

प्रस्थान सोहळे पार पाडत 'ग्यानबा तुकाराम' गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहेआणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्व काय? उद्दिष्ट काय? याविषयी क्वचितच माहिती असते. हाच हरिमय इतिहास, वारीची दिव्य परांपरा आज आपण अगदी सोप्या आणि सध्या शब्दात उलगडणार आहोत. 

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोर म्हणतात, 'महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत पण ही 'पंढरीची वारी'Pandharichiwari ' म्हणजे प्रथा नाही तर आपल्या विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे. जी अखंड आणि अभंग सुरू आहे.' 


आज लाखो लोक शेकडो दिंड्यांतून चालत पंढरीच्या आषाढी यात्रेला येतात. ही पायी वारीची परंपरा हजार वर्षांपेक्षा जुनी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीही पंढरीची वारी होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीचे वारकरी होते. ते ज्ञानदेवांना व इतर मुलांना पंढरीच्या वारीला घेवून गेले.

साधु संत मायबाप तिही केले कृपादान ।

पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥’

असे खुद्द ज्ञानेश्वरांनी एका अभंगात म्हटले आहे. नामदेवांनी विठ्ठलाच्या आरतीत आषाढी व कार्तिकी यात्रेचा उल्लेख केला आहे.

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती।।

दर्शन हे कामाचे तया होय मुक्ती।

केशवासी नामदेव भावे ओवाळती।।’

एका अभंगात नामदेव म्हणतात, की पांडुरंगच भक्तांना सांगत आहे, बाबा रे आषाढी - कार्तिकीला मल विसरू नका.

आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ।।’

ही परंपरा भानुदास व एकनाथ या संतांनी चालविली. भानुदासांनी तर विजयनगरला नेलेली मूर्ती परत आणली व वारीची परंपरा खंडित होवू दिली नाही. एकनाथ महाराज ही पायी वारी करीत होते. त्यांनी अभंगात म्हटले आहे,

धन्य धन्य पंढरपूर। वाहे भीवरा समोर।

म्हणोनि नेमे वारकरी। करती वारी अहर्निशी।

त्यानंतर तुकारामांच्या काळातही पंढरीची वारी मोठ्या प्रमाणावर भरत होती. ते म्हणतात,

आषाढी निकट । आला कार्तिकीचा हाट ।

पुरे दोन्हीच बाजार। नलगे आणिक व्यापार।

असे म्हणतात की, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून पंढरीची वारी पायी करत होते. तुकाराम महाराजांची परंपरा बहिणाबाई, त्यांचे वंशज चौदा टाळकरी, रामेश्वर भट्ट अशा अनेक लोकांनी पुढे चालविली. पण, ती चालविणार्‍यांमध्ये साक्षात्कारी संत होते. नंतर संत विठोबारायांना तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला व उपदेश दिला. निळोवारायानंतर शंकरस्वामी शिऊरकर यांना उपदेश प्राप्त झाला. त्यांच्यापासून मल्लाप्पा वासकर (शके 1631 ते 1721) यांना उपदेश प्राप्त झाला. त्यांनी फड काढला. नाथ, तुकोबा यांच्यानंतर लुप्त झालेल्या फडांना त्यांनी पुन्हा चालना दिली. त्यानंतर प्रमुख फड निर्माण झाले. त्यात वासकर फडाला अग्रस्थान प्राप्त झाले. तुकाराम महाराजांचे पणतू गोपाळ बुवा यांचाही फड महत्वाचा मानला जातो.

म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनंतर नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, त्यानंतर भानुदास, एकनाथ, तुकाराम, निळोबा, शंकरस्वामी, शिऊरकर मल्लाप्पा वासकर यांनी पंढरपूरच्या वारीचा क्रम वाढवीत नेला.


पालखी सोहळ्याचा आरंभ : 

ज्ञानेश्वर महाराजांचा आजचा जो सोहळा आहे त्यांची सुरूवात मात्र दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हैवतबाबा आरफळकर यांनी केली. त्यांचा जन्म सरदार कुळात झाला होता. ते ग्वाल्हेरहून परत येत असताना चोरांनी गाठले व एका गुहेत कोंडले. तेथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केला. त्याच राजाच्या नायकास मुलगा झाला व आनंदाप्रित्यर्थ त्यांनी हैबतबाबांना सोडले. ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आपण सुटलो. आता उर्वरित आयुष्य ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करू, असा निर्धार करून ते आळंदीला आले व तेथेच राहिले. आळंदीला माउलीच्या समाधीपुढे रात्रीच्या शेजारतीपासून सकाळच्या आरतीपर्यंत ते भजन करीत. त्यांनी मनोभावे माउलींच्या सेवेत आपले आयुष्य घालविले. त्यांच्यापूर्वी माउलीच्या पादुका गळ्यात घालून पंढरपूरच्या वारीला येण्याची प्रथा होती. बाबांनी त्या पादुका पालखीत घालून दिंड्या काढून भजन करीत सोहळा नेण्याची परंपरा सुरू केली. आजचा पालखी सोहळा त्यांच्या परिश्रमाचे व भक्तीचे फळ आहे. हैबतबाबांना खंडोजीबाबा नावाच्या एका महात्म्याने खूप सहाय्य झाले. खंडोजीबाबांचे टाळकरी एक शेडगेबाबा होते. त्यांनी पालखी सोहळा वाढविण्याच्या कामी खूप कष्ट केले. या पालखी सोहळ्यास हत्ती, वगैरे लवाजमा औंधच्या राजाकडून येत होता. त्याला त्या काळाचे राजे, पेशवे मदत करीत असत. पुढे इंग्रजांचे राज्य आल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे.
Asadhivari

No comments

Powered by Blogger.